Thursday, June 23, 2011

२०. पुन्हा स्मशानी


पुन्हा स्मशानी घडायचे ते घडून गेले
चितेवरी लोक जे नको ते रडून गेले
दिले कशाला नभास झोके तुझ्या स्वरांनी?
कधीच गाणे तुझे मला शिंपडून गेले


अरे, नसे हा सवाल माझ्याच आसवांचा
युगायुगांचे रुमाल सारे सडून गेले!
करु तरी काय सांग माझ्या कलंदरीचे?
कसा फिरु? आसवांत रस्ते बुडून गेले!


कुणाकुणाची कितीकिती खंत बाळगू मी?
अताच आयुष्यही शिवी हासडून गेले!
सुगंध तो कालचा तुला मी कुठून देऊ?
अखेरचे थेंब अत्तराचे उडून गेले!


–  सुरेश भट

१९. बरे नाही


हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही
चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही


जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे
मागचे जुने देणे टाळणे बरे नाही


ऐक तू ज़रा माझे…सोड मोह स्वप्नांचा
आजकाल स्वप्नांचे वागणे बरे नाही


जाहली न कोणाची सांग राखरांगोळी ?
आपुलीच रांगोळी काढ़णे बरे नाही


आज मोकळे बोलू ! आज मोकळे होऊ !
जीव एकमेकांचा जाळणे बरे नाही


कालचा तुझा माझा चंद्र वेगळा होता…
हे उन्हात आलेले चांदणे बरे नाही


मैफिलीत या माझ्या पहातेस का खाली ?
हाय, लाजणारयाने जागणे बरे नाही…


-सुरेश भट

१८. उशीर


हेही असेच होते, तेही तसेच होते
आपापल्या ठिकाणी सारे ससेच होते!
केले न बंड कोणी.. त्या घोषणाच होत्या!
ज्यांनी उठाव केला तेही घसेच होते!


आला न गंध त्यांना केव्हाच चंदनाचा.. 
सारे उगाळलेले ते कोळसेच होते!
तू भेटलीस तेव्हा मी बोललोच नाही!
तू भेटतेस तेव्हा माझे असेच होते!


होती न ती दयाही.. ती जाहिरात होती!
जे प्रेम वाटले ते माझे हसेच होते!
झाला उशीर जेव्हा हाका तुला दिल्या मी. 
मातीत पावलांचे काही ठसेच होते!


- सुरेश भट

१७. एल्गार


अद्यापही सुर्‍याला माझा सराव नाही
अद्यापही पुरेसा हा खोल घाव नाही


येथे पिसुन माझे काळीज बैसलों मी
आत्ता भल्याभल्यांचा हातात डाव नाही


हे दुख राजवर्खी...हे दुख मोरपंखी...
जे जन्मजात दुखी त्यांचा निभाव नाही


त्यांना कसे विचारू - कोठे पहाट झाली?
त्यांच्यापल्याड त्यांची कोठेच धाव नाही


जी काल पेटली ती वस्ती मुजोर होती
गावात सज्जनांच्या आता तनाव नाही


झाले फरार कुठे संतप्त राजबिंडे
कोठेच आसवांचा बाका बनाव नाही


गर्दित गारद्यांच्या सामील रामशास्त्री
मेल्याविन मडयाला आता उपाव नाही


जावे कुण्या ठिकाणी उद्वस्त पापियांनी?
संतांतही घराच्या राखेस भाव नाही


उचारणार नाही कोणीच शापवाणी...
तैसा  ऋषिमुनिंचा लेखी ठराव नाही


साद्याच माणसांचा एल्गार येत आहे...
हा थोर गांडूळाचा भोंदू जमाव नाही !


ओठी तुझ्या न आले अद्याप नाव माझे
अन् ओठ शोधण्याचा माझा स्वभाव नाही

Monday, June 13, 2011

१६. मी नाही!

जिवंत कोण? कुणालाच बातमी नाही
दिसे हरेक तरी.. सावली हमी नाही

किती धुवाल तुम्ही रक्त शेवटी अमुचे
पचेल खून असा रंग मोसमी नाही

जपून वेच, फुले ही जनावरांसाठी
अरे, वसंत असा येत नेहमी नाही!

अम्हास रोज तुझे शब्द सांगतो वारा
तुला कळेल.. तुझी शॄंखला घुमी नाही

धनुष्यबाण जरी शोधशोधतो आम्ही
कसे अरण्य! इथे एकही शमी नाही!

दिलास तूच मला तूच हा रिता पेला
नसेल थेंब, तरी धुंद ही कमी नाही!

विचारतेस कशी बावरुन ताऱ्यांना..
घरासमोर तुझ्या चांदण्यात मी नाही!

१५. हा असा चंद्र


हा असा चंद्र.. अशी रात फिरायासाठी
तूच नाहीस इथे हात धरायासाठी

चेहरातो न इथे ही न फुलांची वस्ती!
राहिले कोण अत सांग झुरायासाठी

कालचे तेच फिके रंग नकोसे झाले
दे तुझे ओठ नवा रंग भरायासाठी


आडवी एक तिथे भिंत मनाची आली
दार होतेच कुठे आत शिरायासाठी?

नेहमीचेच जुने घाव कशाला मोजू?
ये गडे उभा जन्म चिरायासाठी!


काय आगीत कधी आग जळाली होती
लोक नेतील मला खोल पुरायासाठी!

१४. अखेरचे थेंब


पुन्हा स्मशानी घडायचे ते घडून गेले
चितेवरी लोक जे नको ते रडून गेले

दिले कशाला नभास झोके तुझ्या स्वरांनी?
कधीच गाणे तुझे मला शिंपडून गेले

अरे, नसे हा सवाल माझ्याच आसवांचा
युगायुगांचे रुमाल सारे सडून गेले!

करु तरी काय सांग माझ्या कलंदरीचे?
कसा फिरु? आसवांत रस्ते बुडून गेले!

कुणाकुणाची कितीकिती खंत बाळगू मी?
आताच आयुष्यही शिवी हासडून गेले!

सुगंध तो कालचा तुला मी कुठून देऊ?
अखेरचे थेंब अत्तराचे उडून गेले!