Monday, June 13, 2011

१२. आकाश उजळले होते


इतकेच मला जातांना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते

ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही
मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते

गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या
(पाऊल कधी वाऱ्याने माघारी वळले होते?)

मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी
मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते

याचेच रडू आले की जमले न मला रडणेही
मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते

नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली
नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते

घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते

मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो
मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते

११. बोलणी


आसवांच्या सरी बोलती
मी न बोले, तरी बोलती

ऐक डोळेच माझे अता
ओठ काहीतरी बोलती

संत मोकाट बेवारशी
सांड संतापरी बोलती

बांधती चोर जेव्हा यशे
"ही कृपा ईश्वरी"- बोलती

शांत काटे बिचारे परी
ही फुले बोचरी बोलती

तेच सापापरी चावती
जे असे भरजरी बोलती

रोग टाळ्या पिटू लागले
"छान धन्वंतरी बोलती !"

झुंजणारे खुले बोलती
बोलणारे घरी बोलती

१०. मेघ


पुन्हा तेजाब दु:खाचे उरी फेसाळुनी गेले
पुन्हा गाणे तुझे ओठावरी घोटाळुनी गेले

मनाच्या खोल अंधारी कुणाच्या ऐकतो हाका ?
मघाशी कोणते डोळे मला ओवाळुनी गेले ?
कराया लागलो जेव्हा तुझी स्वप्नासवे चर्चा
खुलासे भूतकाळाचे मला गुंडाळुनी गेले
उपाशी प्रश्न हा माझा उभा आहे तुझ्या दारी
'कसे तारुण्य ते होते मला जे टाळुनी गेले ?'
पुरे आता पुरे चर्चा सुळाच्या मोजमापाची
बळीचे रक्तही येथे कधीचे वाळुनी गेले
कुठे होतीस तू जेव्हा दिशा झंकारल्या होत्या ?
कुठे गेलीस तू जेव्हा ऋतू गंधाळुनी गेले
असा काही आला मला जगायाचाच कंटाळा
अता आयुष्यही माझे मला कंटाळुनी गेले
मला तू सांग आकाशा ... तुझा आषाढ कोणाचा ?
अरे ते मेघ होते जे घराला जाळुनी गेले

९. ओठ


तू नभातले तारे माळलेस का तेव्हा ?
माझियाच स्वप्नांना गाळलेस का तेव्हा ?
आज का तुला माझे एव्हढे रडू आले ?
तू चितेवरी अश्रू ढाळलेस का तेव्हा ?
हे तुझे मला आता वाचणे सुरू झाले
एक पानही माझे चाळलेस का तेव्हा ?
बोलली मिठी माझी - ' दे प्रकाश थोडासा'
तू मला तशा रात्री जाळलेस का तेव्हा ?
कालच्या वसंताला ठेवतेस का नावे ?
वायदे फुलायाचे पाळलेस का तेव्हा ?
चुंबिलास तू माझा शब्द शब्द एकांती
ओठ नेमके माझे टाळलेस का तेव्हा ?

८. दर्जेदार


ती कुणाची झुंज होती? तो कसा जोहार होता?
जो निखारा वेचला मी तो निखारा गार होता!
हा कसा आता उन्हाचा निर्दयी पाऊस आला?
मी मघाशी पाहिलेला मेघ काळाशार होता!
गांजले ज्यांनी मला ते शेवटी माझेच होते...
हा कळीचा दंश होता! तो फुलांचा वार होता!
ह्या करंट्यांनी स्वतःचे फोडले आधीच डोळे..
(त्यांचियासाठी उद्याचा सूर्य अत्याचार होता!)
स्वागतासाठीच माझ्या भुंकले ते आदराने
थुंकले तोंडावरी तो केवढा सत्कार होता!
गाडल्या त्यांनी पिढ्या अन् ठेवला नाही पुरावा
ह्या स्मशानाच्या धन्यांचा देव ताबेदार होता!
लागला आहे अताशा वेदनेचा शौक त्यांना
(एरवी, त्यांचा सुखाचा चोरटा व्यापार होता!)
चोरली माझ्या घराची राखही त्याने परंतू
मी न केला ओरडा..तो चोर अब्रुदार होता!
पाहिला नाही जरी मी चेहरा मारेकर्‍याचा
लोकहो, माझा तरीही खून दर्जेदार होता!

७. संक्षेप


हा ठोकरून गेला, तो वापरून गेला..
जो भेटला मला तो वांधा करून गेला!
वेशीवरी मनाच्या आले सवाल सारे
माझा सवाल माझ्या ओठी विरून गेला
माझ्याविना फुलांची दिंडी निघून गेली
काटाच प्यार आता जो मोहरून गेला
चाहूल ही तुझी की, ही हूल चांदण्याची?
जो चंद्र पाहिला मी तोही दुरून गेला!
केव्हाच आसवांची गेली पुसून गावे..
स्वप्नामधेच माझा रस्ता सरून गेला
बोलू कुणास देई आकांत हा सुखाचा?
मागेच दु:खितांचा टाहो मरून गेला!
कानात कोठडीच्या किंचाळला झरोका-
"बाहेर एक कैदी तारा धरून गेला!"
आजन्म ही तुझी मी केल्यावरी प्रतीक्षा..
माझाच भास माझ्या अंगावरून गेला!

६. पाठ


सोडताना प्राण त्यांना मी कुठे बोलावले?
खातरी झाली न त्याची.. ते घरी डोकावले!

हा कसा झिम्मा विजांशी ओठ माझे खेळती..
कोणते आकाश माझ्या अंतरी पान्हावले?

ऐकली आजन्म त्यांची मी शिळी रामायणे
(शेवटी मी बोललो अन् ते किती रागावले!)

मी न स्वप्नांचे कधीही मान्य केले मागणे
दुःख माझे एकट्याचे मी कधी लाडावले?

जीवना रे, एकदाही मी न टाहो फोडला
पाहणाऱ्यांचेच डोळे शेवटी पाणावले!

वेचण्या जेव्हा निघालो माणसांची आसवे
माझियामागे भिकारी शब्द सारे धावले!

वार झेलायास केली मी खुली छाती जरी
नेमके पाठीस माझ्या चावणारे चावले!